महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोहण्यासाठी गेलेल्या चुलत भावंडाचा तलावात बुडून मृत्यू

पैठण तालुक्याच्या थेरगावमध्ये दहावीत शिकणाऱ्या दोन चुलत भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Nov 13, 2019, 8:31 PM IST

औरंगाबाद- पैठण तालुक्याच्या थेरगावमध्ये दहावीत शिकणाऱ्या दोन चुलत भावंडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उन्हामुळे शाळा सुटल्यानंतर गावाजवळील तलावात पोहण्यासाठी ही दोन भावंडे गेली होती, त्यावेळी ही दुर्घटना घडली.

सोपान रमेश गोलांडे व सोमनाथ बप्पासाहेब गोलांडे (वय 15, दोघे रा. थेरगाव, ता. पैठण) अशी त्यांची नावे आहेत. गावाजवळील जलसंधारणाच्या माध्यमातून बजाज फाउंडेशनने तलाव खोलीकरण केले होते. त्यानंतर पैठण पाचोड रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरुमासाठी या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. या तलावात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. गावातील अनेक नागरिक व मुले दुपारच्या उन्हाच्या तडाख्यात या ठिकाणी पोहण्यासाठी जात असतात याप्रमाणे सोमनाथ गोलांडे व सोपान गोलांडे हे दोघे भाऊ गावातील चार ते पाच मित्रांसोबत आज (बुधवार) दुपारी शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी गेले होते.

या दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे भाऊ पाण्यात बुडत असताना सोबतच्या मित्रांनी पॅन्ट व शर्ट एकमेकांना बांधून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रस्त्यावरील नागरिकांना आवाज देऊन त्यांना घटनास्थळी बोलावल आणि वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्यातून बाहेर काढेपर्यंत दोन्ही भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. बाहेर काढून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी त्यांना दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले असून उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आले. या घटनेमुळे थेरगावसह पाचोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची आकस्मिक नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details