औरंगाबाद :शहरातील घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाच्या ३३ खाटांच्या वॉर्डमध्ये तब्बल ५८ बालके उपचार घेत आहेत. त्यातच येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सलाईन, व्हेंटिलेटर लावून एकाच खाटेवर दोन बालकांवर उपचार केले जात आहेत. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
घाटी रुग्णालयावर ताण
शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अचानक रुंग्णसंख्या वाढल्याने घाटी रुग्णालयावर ताण पडला आहे. त्यामुळे बालरोग विभागाच्या ३३ खाटांच्या वॉर्डमध्ये तब्बल ५८ बालके सलाईन, व्हेंटिलेटरवर आहेत. परिणामी बालरोग विभागात एकच बेडवर दोन बालकांना उपचार घ्यावा लागत आहे. तसा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात एकाच खाटेवर दोन बालकांवर उपचार केले जात आहेत.