औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील रेल्वे आणि बस सेवा ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज शहर बस स्थानकावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. पहिल्यांदाच सर्वत्र शांतता दिसून आली असून रोज धावणाऱ्या बसेस आज डेपोत उभ्या राहिल्याचे चित्र शहरातील दोन्ही बस स्थानकांवर दिसून आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी शहरात दोन बस स्थानक आहेत. मुख्य बस स्थानक आणि सिडको बस स्थानकामधून रोज किमान ३ हजार बसेसच्या फेऱ्या होतात. तर, साधारणतः २५ ते ३० लाखांची उलाढाल होते. मात्र, आज जनता कर्फ्यूमुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे नेहमी हजारो प्रवाशांनी गजबजून असणारे बस स्थानक आज मात्र निर्मणुष्य दिसून आले. शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शहर परिवहन मंडळाने देखील कंबर कसल्याचे दिसून आले.
परिवहन मंडळाकडून आज मुख्य बस स्थानकावर स्वच्छतेची कामे करण्यात आली. खराब झालेली फरशी, आसन व्यवस्था, सर्वच स्वच्छ करून त्यावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. गजबजलेले बस स्थानक असल्याने स्वच्छता म्हणावी तशी होत नाही, त्यामुळे आज ही कामे करून घेत असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांची स्वछता करण्यात येत आहे. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून काळजी घेतली जात आहे. बसमध्ये एका सीटवर एकच प्रवाशी बसवला जात आहे. त्यामुळे, प्रवाशी संख्या कमी झाल्याने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सोमवार पासून राज्यातील परिवहन सेवा बंद होणार असल्याने कोरोना विषाणूचे निर्मुलन होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-covid19: औरंगाबादच्या 'त्या' महिलेने केली कोरोनावर मात...