सिल्लोड -औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील पिंपरी परिसरात पोलिसांनी मोटारसायकलवरून गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 16 हजारांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
सिल्लोडमध्ये 16 हजारांचा गांजा जप्त, दोघांना ताब्यात गेल्या काही वर्षांपासून सिल्लोड तालुका परिसरात अवैध गांजाची तस्करी सुरू आहे. काल (29 एप्रिल) सायंकाळी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड-भोकरदन रोडवर पिंपरी परिसरातून मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींच्या ताब्यातून 1610 ग्रॅम म्हणजेच सुमारे 16 हजार रुपयांचा गांजा जप्त केला. त्या दोन गांजा तस्करांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी सुधाकर धुपाजी ठाले (रा. ठालेवाडी, ता. भोकरदन, जि. जालना) आणि गणेश गमजी सिरसाठ (रा. पिंपरी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) या आरोपीस ताब्यात घेतले. याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली आहे.
लॉकडाऊनचा असाही वापर
सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बाहेर नागरिकांची वर्दळ कमी असल्याने अवैध धंदेवाल्यानी आता डोके वर काढले आहे. निर्मनुष्य परिसराचा फायदा घेत अवैध धंदेवाले आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यात वाळू, दारू, गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीचा समावेश आहे.
दारूमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग?
सध्या कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यातील काही गावात कोरोना रूग्णसंख्या जास्त आहे. त्यामुळे या रूग्ण असलेल्या गावातील तळीरामाची दारू वाचून चांगलीच गोची झाली आहे. यामुळे ते संध्याकाळची सोय करण्यासाठी शेजारच्या गावात दारू मिळते का? यासाठी चकरा मारतात. त्यांच्या इतर गावातील वाढत्या वावरामुळे त्याही गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -'केंद्राकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी'
हेही वाचा -स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीचा केला खून; पतीला अटक