महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीएसएनएलच्या महिला अधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी; दोन अट्टल गुन्हेगारांना अटक - bsnl sub divisional officer aurangabad

जालन्याच्या बीएसएनएल कार्यालयात उपमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता बाबासाहेब नरवडे (४२, रा. नंदनवन कॉलनी) या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यालयातील महिला भावसार आणि अधिकारी प्रसाद देशपांडे यांच्यासह कारने (एमएच-२०-ईजे-०७५७) औरंगाबादकडे येत होत्या. त्यावेळी त्यांच्या कारला सेव्हन हिल उड्डापुलाजवळ दुचाकीवर आलेल्या सहा ते सात जणांनी अडवले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ करुन प्रशांत चंद्रमोरे आणि अ‍ॅड. नयुम शेख यांची माणसे असल्याचे सांगितले.

Arrested accused
अटक करण्यात आलेले आरोपी.

By

Published : Sep 6, 2020, 4:11 PM IST

औरंगाबाद - बीएसएनएलच्या महिला अधिकाऱ्याकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे.

जालन्याच्या बीएसएनएल कार्यालयात उपमंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता बाबासाहेब नरवडे (४२, रा. नंदनवन कॉलनी) या ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यालयातील महिला भावसार आणि अधिकारी प्रसाद देशपांडे यांच्यासह कारने (एमएच-२०-ईजे-०७५७) औरंगाबादकडे येत होत्या. त्यावेळी त्यांच्या कारला सेव्हन हिल उड्डापुलाजवळ दुचाकींवर आलेल्या सहा ते सात जणांनी अडवले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून प्रशांत चंद्रमोरे आणि अ‍ॅड. नयुम शेख यांची माणसे आहोत. तुमच्याकडे 50 लाख रुपये शिल्लक आहेत, असे म्हणत खंडणीची मागणी केली होती. तसेच कारच्या काचेतून हात घालत त्यांनी नरवडे यांचा गळा धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नरवडे यांच्यापर्यंत हात न पोहोचल्याने टोळक्याने कारवर समोरून दगड फेकत काच फोडली होती. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर काल (शनिवारी) ५ सप्टेंबरला पुंडलिकनगर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या प्रकरणात फिरोज खान जोहर खान (२३, रा. हुसेन कॉलनी) आणि फय्याज बशीर पठाण (३०, रा. बायजीपुरा) यांना अटक केली आहे. त्यांनी नरवडे यांच्याकडे खंडणी मागितल्याची कबुली दिली. त्यावरुन त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात देखील अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रावसाहेब मुळे, जमादार रमेश सांगळे, पोलीस नाईक बाळाराम चौरे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details