छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपूरमध्ये दंगल उसळली. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी या दंगलीच्या तपासासाठी १२ सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे मुख्य तपास अधिकारी असून किराडपुरा दंगल प्रकरणाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. सात पथके २४ तास संशयितांचा शोध घेतील. या दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना अटक केली असून, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी ४० हून अधिक आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
सीसीटीव्हीची तपासणी : दंगलीदरम्यान आरोपींनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून तपास सुरू करण्यात आला आहे. शेकडो सीसीटीव्ही तपासून आणि त्याचे स्क्रिनशॉट्स घेऊन आरोपींची ओळख पटवली जाईल, तर अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईल चॅट तपासले जात असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. दंगलीदरम्यान आरोपींनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. एवढेच नाही तर पोलिसांच्या वाहनांसह अन्य 14 वाहने जाळण्यात आली. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेच्या एका दिवसानंतर पोलिसांनी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल केले. पहिल्या दिवशी सात आणि दुसऱ्या दिवशी चार जणांना अटक करण्यात आली. तिसऱ्या दिवशी आणखी 17 जणांना अटक केल्याचे समोर आले असून, लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले.