महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायदा सर्वांना समान! पोलिसांनी सत्ताधारी आमदार पुत्राला शिकवला धडा, वाहनावर असलेला दंड केला वसूल

Traffic Police Action on MLA Son : राजकीय नेते पुढाऱ्यांच्या नियम मोडणाऱ्या वाहनांना वाहतूक पोलीस दंड आकारत नाही, असा समज सर्वसामन्या जनतेमध्ये आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या वाहतूक पोलिसांनी सत्ताधारी आमदाराच्या पुत्राला चांगलाच धडा शिकवत वाहनावरील थकीत दंडही वसूल केलाय.

Traffic Police Action on MLA Son
Traffic Police Action on MLA Son

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 10:27 AM IST

पोलिसांनी आमदार पुत्राला शिकवला धडा

छत्रपती संभाजीनगर Traffic Police Action on MLA Son :कायदा मोडणाऱ्या आमदार पुत्राला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरात घडलीय. जालना जिल्ह्याच्या भाजपा आमदार पुत्रानं नियम मोडला. एवढंच नव्हे तर वाहन थांबल्यावर पोलिसांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळं एक हजारांचा दंड आणि जुना प्रलंबित असलेला आठ हजाराचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केलाय. त्यामुळं शहरात या आमदाराची आणि पुत्राची चर्चा चांगलीच रंगलीय.

आमदार पुत्रानं मोडला नियम : बुधवारी रात्री शहर पोलिसांनी गाड्यांची तपासणी करण्याची विशेष मोहीम राबवली. विशेषतः गर्दी असलेल्या ठिकाणी गाड्यांची कागदपत्र वाहन परवाना इत्यादी कागदपत्र तपासणीला सुरुवात केली. कॅनॉट परिसरात अशीच कारवाई सुरु असताना आठ ते नऊच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वावरताना आढळून आली. नियमात नसलेली नंबर आणि डिस्को लाईटमुळं पोलिसांनी ही गाडी थांबवली. गाडीचा काच खाली करायला सांगतात गाडी चालवत असलेल्या आमदार पुत्रानं तुम्हाला ही गाडी माहिती नाही का? असं उद्धटपणं उत्तर दिलं. त्यावेळी त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मिरधे यांनी गाडी चालवण्याचा परवाना विचारताच, 'माझ्याकडं नाहीये तुम्हाला काय करायचं ते करून घ्या' असं पुन्हा उद्धटपणे उत्तर दिलं.

8 हजारांचा दंडही होता बाकी-पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट आणि डिस्को लाईट लावल्यामुळं 500-500 रुपयांचे वेगवेगळे दंड लावले. तसंच पोलिसांकडं असलेल्या मशीनमध्ये गाडीचा नंबर टाकल्यावर ही गाडी बदनापुरचे भाजपा आमदार नारायण कुचे यांची असल्याचं निदर्शनास आलं, इतकंच नाही तर जुना आठ हजारांचा दंड बाकी असल्याचं पोलिसांना कळल्यानं, हा दंडदेखील भरण्यास त्यांच्या मुलाला सांगण्यात आलं.

पत्रकार आल्यानं भरावा लागला दंड : पोलिसांनी गाडी अडवून दंड लावताच चिडलेल्या मुलानं वडील आमदार नारायण कूचे यांना फोन लावून सर्व प्रकार सांगितला. त्यावर कुचे यांनी तिथं पत्रकार आहेत का? असा प्रश्न विचारला. मुलानं हो असं म्हणताच दंड भरुन टाक असं त्यांनी सांगितलं. मुलानं तातडीने आपल्या परिचित व्यक्तीला बोलावून घेत जुना आठ हजार आणि नव्यानं लावलेला एक हजार असा नऊ हजारांचा दंड भरला. या कारवाईमुळं कायदा सर्वांना सारखाच असतो, असा संदेश शहर पोलिसांनी दिला. बुधवारी पोलिसांनी 406 वाहनांची तपासणी करून 212 वाहनांना दंड लावलाय. आमदार नारायण कूचे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा :

  1. जयपूर; काँग्रेसचे आमदार विश्वेंद्रसिंग यांचे पुत्र अनिरुद्ध यांचे काँग्रेसवरच गंभीर आरोप
  2. Maratha Reservation Protest : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापासून आमच्या जीवितास धोका, मराठा आंदोलकांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details