औरंगाबाद- कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटन स्थळ अर्धक्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि. 29 जून) अजिंठा आणि वेरूळ लेणीसह, बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला या पर्यटन स्थळांमध्ये मर्यादित पर्यटकांना प्रवेश असणार आहे.
जळगाव जिल्हा जवळ असल्याने अजिंठा लेणीत हाय अलर्ट
औरंगाबादची जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. अजिंठा लेणीपासून जळगाव जिल्हा जवळ असल्याने हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागातून लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. पर्यटनाच्या माध्यमातून संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.
मागील आठवड्यात पर्यटन स्थळ उघडण्यास मिळाली होती परवानगी
पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणारी राज्यातील पर्यटन स्थळ 14 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रोज दोन हजार पर्यटकांना पर्यटन स्थळात परवानगी देण्यात आली होती. दुसरीकडे व्यवसायिकांची आरोग्य तापासणीसह लसीकरण अनिवार्य करण्यात आले होते. पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा असताना, दोन आठवड्यातच नवे निर्बंध लावावे लागल्याने पर्यटन व्यवसायिक नाराज झाले आहेत. मागील वर्षभरापासून पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. आता नियम अटी लावून तरी पर्यटन व्यवसाय सुरू ठेवावा, अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.
हेही वाचा -राज्यातील 25 हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत; औरंगाबाद खंडपीठाने 89 याचिका फेटाळल्या