औरंगाबाद- जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ऐन उमेदीच्या काळात पदरी निराशा आली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटोला काळे डाग पडले असून त्यांची वाढ खुंटल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
औरंगाबादच्या पळशी गावातील योगेश पळसकर यांनी आपल्या ३० गुंठे शेतात टोमॅटोचे पीक घेतले. मात्र, अती पावसामुळे टोमॅटोला काळे डाग पडू लागले असून त्यांची वाढ खुंटल्याने आलेले पीक पूर्णतः वाया गेल आहे. त्यामुळे, यावर्षी टोमॅटो पासून उत्पन्न निघेल याची आशा मावळली असून पुन्हा एकदा सरकारकडे मदत मागण्याची वेळ आल्याचे योगेश पळसकर यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी टोमॅटो पिकामुळे पळसकर यांना जवळपास अडीच लाखापर्यंत उत्पन्न निघाले होते. मात्र, यावर्षी टोमॅटो खराब होत आहे. नुकसान टाळण्यासाठी त्यांनी टोमॅटो पिकावर फवारणी केली. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. आता टोमॅटोपासून काही उत्पन्न मिळणार नाही, अशी भिती पळसकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. काही भागात खोल जमीन असलेल्या शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. टोमॅटोवर रोग पडलेला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी योग्य फवारणी केल्यास टोमॅटो काही प्रमाणात वाचवता येऊ शकतो, असे मत जिल्हा परिषद कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी व्यक्त केले आहे.
अती पावसामुळे टोमॅटोवर करपा आणि बुरशी प्रकारचा आजार पडला आहे. झाडांना लागलेल्या फुल कळीत पावसाचे पाणी साठवून कळी कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. फुलकळी गळून पडत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी बाजारात आणला आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळधारनेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. संततधार पावसामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करत आहे. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे फवारलेली औषध पाण्यामुळे निघून जात असल्याने, फवारणी केल्यानंतरही टोमॅटोचे नुकसान होत असल्याचे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-मराठा आरक्षण याचिकेची सुनावणी पाच न्यायमुर्तींसमोर होईल, विनोद पाटील यांना विश्वास