औरंगाबाद - 15 ऑक्टोबर जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. मात्र हात धुण्याचे महत्व पटवून दिले ते कोरोना आजाराने. आजारपण टाळण्यासाठी शरारीराची काळजी घेणे, हात धुणे याबाबत मुलांमध्ये विशेषतः जनजागृती झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबत विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
कोरोनाने शिकविले हात धुण्याचे महत्व दीड वर्षात पडला फरक -
कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात बदल आला आहे. दीड वर्षाआधी हात धुण्याचे महत्व अनेकांना कळले नव्हते. बाहेरून आल्यावर हात न धुताच ते घरात वावरत असायचे. त्यात लहान मुलांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वच हात न धुताच आपले काम करत होते. मात्र कोरोनामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे, याचे महत्व पटले. कोरोना महामारीमुळे आता बहुतांश लोक दिवसातून किमान तीन ते चार वेळेस हात धुतात. विशेषतः शालेय विद्यार्थी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना दिसत आहे. कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात हा सकारात्मक बदल झाल्याचे पाटोदा येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती -
जागतिक हात धुणे दिवसाचे औचित्य साधून पाटोदा गावात जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना हात धुण्याबाबतब माहिती देऊन, हात धुताना काय काळजी घेतली जावी याबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे डॉ. संजय वाघ यांनी दिली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना हात धुण्याबाबत किती महत्व कळले ते कशी काळजी घेत आहेत.