औरंगाबाद : विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या दोन पदवीधरच्या जागांसाठी आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपकडून पाच जागांच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याची आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान त्यापूर्वीच भाजप (BJP), राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दोन्ही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले असतानाच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
बंडखोरीची चर्चा :शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारपासून कालपर्यंत 25 जणांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. ते 12 जानेवारीला पुन्हा अर्ज भरणार आहेत. तसेच विद्यमान आमदार विक्रम काळे आज अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत आहे. याचवेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या दोघांनी अजूनही अर्ज दाखल केलेले नाहीत. मात्र त्यांनी अर्ज नेल्याने बंडखोरीची चर्चा रंगत आहे. त्यामुळे या दोघांची समज काढण्याचे पक्षासमोर आव्हान असणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
काय आहे पदवीधर निवडणूक : महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावे अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो.
हेही वाचा : Legislative Council Elections शिक्षक पदवीधर निवडणूकीतील दोन जागांचा फैसला बुधवारी अंबादास दानवेंची माहिती