औरंगाबाद - हर्सूल कारागृहात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या जिन्सी परिसरातील कुख्यात गुन्हेगारांनी न्यायालय परिसरात टिक-टॉक व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम अशी व्हिडिओ बनवणाऱ्यांची नावे आहेत.
कुख्यात गुन्हेगारांनी न्यायालय परिसरात बनवला टिक-टॉक व्हिडिओ
औरंगाबादमधील कुख्यात गुन्हेगारांनी न्यायालयाच्या आवारामध्ये रमजान मुबारक हो, असा टिक-टॉक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
इर्शाद शेख हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून त्याचा भाऊ एजाज हा मोक्का प्रकरणात बंदी आहे. हे दोन्ही भावंड शहरातील बायजीपुरा भागात गुंडांची टोळी चालवतात. त्यांच्या गुन्हेगारी कारवाया पाहता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या आरोपींना शुक्रवारी न्यायालय परिसरात हजेरीसाठी नेण्यात आले होते. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या आवारामध्ये रमजान मुबारक हो, असा टिक-टॉक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
कुख्यात गुंडांना न्यायालय परिसरात मोबाईल हाताळण्यासाठी देणे धोकादायक असतानाही सुरक्षारक्षकांनी त्यांना मोबाईल हाताळू कसा दिला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे न्यायालय परिसरात कशाप्रकारे कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, हे स्पष्ट होत आहे. मात्र, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आता कारागृह प्रशासन आणि पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणात काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.