सिल्लोड (औरंगाबाद)- रासायनिक खतांची जादा दराने विक्री करणाऱ्या तीन कृषी सेवा केंद्र चालकांना बनावट ग्राहक पाठवून जिल्हा व तालुका कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी 12 वाजता औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.
अरिहंत कृषी सेवा केंद्र, आदिनाथ कृषी सेवा केंद्र व यश कृषी सेवा केंद्र, अशी परवाना निलंबित करण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांची नावे आहेत. तीन कृषी सेवा केंद्र चालकांना रंगेहाथ पकडताच दर्शना कृषी सेवा केंद्र, श्रीनाथ ऍग्रो एजन्सी, गुळवे ऍग्रो एजन्सीच्या चालकांनी काढता पाय घेत धूम ठोकली. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चिंतामणी कृषी सेवा केंद्र चालकाला खत विक्री बंद ठेवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत, असे दीपक गवळी यांनी सांगितले.