औरंगाबाद - पैठणच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या ढोरकीन गावच्या हनुमान मंदिरासमोरील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले आहे. संबंधित घटना शुक्रवारी (दि.20) रोजी पहाटे उघडकीस आली. हे एटीएम इंडिया बँकेचे आहे.
पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील हनुमान मंदिरासमोर मुख्य बाजारपेठेत इंडिया बँकेचे एटीएम बसवण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे मशीन केबीनबाहेर काढले. त्यानंतर वाहनातून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या एटीएम मशीनमध्ये 21 लाखांची रोकड असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
दरम्यान, यापूर्वीही हे एटीएम काही चोरट्यांकडून पळवण्याचा डाव अयशस्वी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याचा काहीसा विसर पडताच पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
यापूर्वी अशी घटना झाल्यानंतरही सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. परिणामी चोरट्यांनी पुन्हा डाव साधला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी गोरख भामरे, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, बिट जमादार चव्हाण, तुकाराम मारकळ, सतीष राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊ पाहाणी केली. श्वान व ठसे तज्ञ पथक देखील आले. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.