औरंगाबाद- वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील काँस्मो कंपनीजवळ गट नंबर 23 प्लाँट क्र. 26 मधील साई उद्योगनगरी येथे उद्योजक नरिंदरसिंग आरोरा यांचे "आरोरा स्पेअर झोन" हे गोडाऊन आहे. गत दहा दिवसापूर्वी या गोडाऊनचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून ट्रकच्या मदतीने २४ लाखाचा ऐवज लांबविला होता. दरम्यान. चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
कबीर बुढण पठाण (वय.28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीबाबत पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळली होती. माहितीच्या आधारे फौजदार विठ्ठल चासकर आणि त्यांच्या पोलीस पथकाने रायगड जिल्ह्यातील तालुका खालापूर-खोपोली येथून एका चोरट्याच्या मुसक्या अवळल्या आहे. तसेच पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक ६ लाखाचा ट्रक आणि दुचाकी वाहनाचे शाँकर, चैन सेट, ब्लाँक पिस्टन किट, हेल्मेट, व्हिल रिम, वाँल किट आदीसह २४ लाख ३४ हजार १७४ रूपये असा एकूण ३० लाख ३४ हजार १७४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे, या चोरीतील अन्य आरोपींची विविध जिल्ह्यातील अशी परप्रांतीय टोळी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या फरार आरोपींची टोळी जेरबंद झाल्यास त्यांच्याकडून अजून काही चोरीच्या गुन्ह्यातील माहिती मिळण्याची शक्यता फौजदार विठ्ठल चासकर यांनी वर्तवली आहे.