औरंगाबाद - शहरात पुन्हा मंगळसूत्र चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. रविवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 57 वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना ज्योतीनगर भागात घडली.
मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या महिलेचे हिसकावले मंगळसुत्र; औरंगाबादेत साखळी चोर सक्रीय - महिला व वृद्धमंडळी
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना ज्योतीनगर भागात घडली. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व तेथून पळ काढला.
शारदा राजकुमार चंदानी (वय 57 रा.अयोध्या अपार्टमेंट, ज्योतीनगर) या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. घरापासून काही अंतरावर जाताच एका मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळ येताच दुचाकीची गती कमी केली. ती मोटारसायकल शारदा चांदणी यांच्या जवळ नेली. आणि चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व तेथून पळ काढला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सानप करीत आहेत.
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
उस्मानपुरा येथील ज्योतीनगर भागात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात महिला व वृद्धमंडळी शतपावली साठी जात असतात. या भागात या पूर्वी देखील मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याने घटना बंद झाल्या. परंतु आता पुन्हा मंगळसूत्र हिसकावल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या परिसरात पोलीस गस्त ठेवण्याची मागणी नागरिकातून होत आहे.