औरंगाबाद :गंगापूर तालुक्यातील देवळी येथील कापूस व्यापारी औरंगाबाद येथून हवाल्याचे पैसे घेऊन परत निघाले होते. त्यावेळी त्यांच्या स्विफ्ट कारला सोलापूर धुळे महामार्गावर करोडी पुलाजवळ चोरट्यांनी अडवले. मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कारची समोरील काच फोडून पिस्तूल लावला. बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला लुटले. ही घटना सोमवारी सायंकाळी आठवाजेच्या दरम्यान सोलापूर धुळे महामार्गावर करोडी फाटा येथे घडली आहे.
व्यापाऱ्यावर रोखली बंदूक :लासुर स्टेशन येथील कापूस व्यापारी साईनाथ तायडे व चालक अनिल भुसारे हे स्विफ्ट कार क्रमांक एम.एच २० सी.एस ३९१५ गाडीने औरंगाबाद येथील कोमटेश मार्केट येथून कापसाच्या हवाल्याचे साडे सत्तावीस लाख रुपये घेऊन लासुर स्टेशनकडे सोलापूर मार्गाने येत होते. तेव्हा करोडी फाट्यावरील फुलावर गाडी अडवून मोटरसायकलने आलेल्या दोघा चोरट्यांनी गाडीत बसलेल्या कापूस व्यापारी साईनाथ तायडे यांच्या हातावर दांड्याने मारले. तसेच कारची समोरील काच फोडत त्यांनी कापूस व्यापाऱ्यावर बंधुक रोखत आणलेली पैशाची बॅग चोरून नेली. अशी फिल्मी स्टाईल धक्कादायक घटना करोडी जवळील फुलावर घडली. लगेच कापूस व्यापारी व त्यांच्या चालकाने घटनेची माहिती कळवताच देवळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत एलसीबीसह दौलताबाद हद्दीतील घटना असल्याने तेथील पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.