औरंगाबाद - गोळ्या-बिस्कीटाच्या मालाचे पैसे घेऊन जात असलेल्या टेम्पोतून दुचाकीस्वारांनी पावणेचार लाखांची रोकड लांबवली. ही घटना गुरुवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास मोंढा नाका ते जाफरगेट रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपावर घडली. बॅग लांबविणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याआधारे दोघांचा शोध सुरु आहे.
पडेगावात गोळ्या-बिस्कीटचा कारखाना असलेले मालक जिन्स ज्ञानराज नाडार यांच्याकडे सलोमन सॅमसन गायकवाड (४५, रा. अमीन चौक, भावसिंगपुरा) व मुजीब जुल्फेकार सय्यद असे दोघे कामाला आहेत. गुरुवारी सायंकाळी गोळ्या-बिस्कीटांचा माल विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेली रक्कम बॅगेत ठेऊन दोघेही टेम्पोतून (एमएच-२६-एडी-६५३१) तीन लाख ६३ हजारांची रोकड घेऊन जात होते. रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास हे दोघेही मोंढा नाका ते जाफरगेट रस्त्यावरील जैन पेट्रोल पंपावर टेम्पोत डिझेल भरण्यासाठी थांबले. याचदरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या टेम्पोतील पैशाची बॅग लांबवली. हा प्रकार घडल्यानंतर गायकवाड आणि मुजीब यांनी घटनेची माहिती दोन तासानंतर मालक नाडार यांना कळवली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाडार यांच्यासह गायकवाड व मुजीब यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.