महाराष्ट्र

maharashtra

'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाड तोडणार नाही तर लावणार'

By

Published : Jan 10, 2020, 1:07 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानासाठी एकही झाड तोडणार नसून आणखी झाडे कशी लावता येतील याचा विचार करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानासाठी एकही झाडे तोडणार नाही. तर उलट अजून किती झाडे लावता येतील याचा विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत सांगितले. बाळासाहेबांचे स्मारक होत असलेल्या प्रियदर्शनी उद्यानाची उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाड तोडणार नाही तर लावणार

औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच स्मारक होणार आहे. मात्र, स्मारकासाठी झाडे तोडली जाणार असल्याची भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली होती. तोच धागा पकडून भाजपने आरे कार शेडला एक न्याय आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वेगळे न्याय का? अशी टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी एकही झाड तोडणार नाही, असे आधीच जाहीर केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत पुन्हा एकदा आपली भूमिका जाहीर केली.

हेही वाचा - 'महाराष्ट्र महाएक्स्पो 2020'चे उद्घाटन ; मराठवाड्यात होणार चार नव्या औद्योगिक वसाहती


औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानात साकारले जाणाऱ्या उद्यानाबाबत वृक्षतोडीबाबत बराच संभ्रम निर्माण झाल्याने बाळासाहेबांचे स्मारक वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्मारकासाठी जवळपास 8 हजार झाडांची कत्तल केली जाणार, अशी भीती निसर्गप्रेमींनी व्यक्त केली होती. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आरे कार शेडसाठी होणारी झाडांची कत्तल थांबवण्याचे आदेश दिले इतकेच नाही तर वृक्षतोड विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे आरे कार शेडला एक न्याय आणि बाळासाहेबांच्या स्मारकाला दुसरा का? अशी चर्चा सुरू झाली होती. इतकेच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर जोरदार टीका करत हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकासाठी झाडाची कत्तल होणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर विभागीय आढावा बैठकीसाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी केली. स्मारक नेमके कसे होईल आणि त्यासाठी झाडे तोडावी लागतील का, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे तोडणार नाही तर आणखी नवी झाडे लावता येतील का, याबाबत आपण विचार करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हेही वाचा - 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details