औरंगाबाद -डिजिटल इंडियाच्या नावाखाली सर्वत्र ऑनलाइन व्यवहार होत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात इंटरनेट राहीले दूर, पण अद्याप मोबाइलला नेटवर्कच येत नाही. या प्रकारामुळे त्रस्त गावकऱ्यांनी आता गावच विकायला काढले आहे. तसा फलकच गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावला. खुलताबाद तालुक्यातील 'भडजी' असे विक्रीला काढलेल्या गावाचे नाव आहे.
कंपन्यांकडून शून्य प्रतिसाद -
देश आता डिजिटल होत आहे. पैशांच्या देवाणघेवाणीपासून ते शिक्षणापर्यंत सर्वच ऑनलाइन झाले आहे. मात्र, खुलताबाद - फुलंब्री रस्त्यावर असलेल्या भडजी या गावात फोनला नेटवर्कच नसल्याने कोणाशीही संपर्क होत नाही. या गावाची लोकसंख्या 2 हजार 800 आहे. मोबाइल क्रांती होऊन बरीच वर्षे लोटली आहेत. आता 5G प्रणाली लवकरच ग्राहकांच्या सेवेत आणण्यासाठी वेगाने काम होत आहे. या सर्व क्रांतीपासून हे गाव आणि गावकरी अजून लांबच आहे. टेलिकॉम कंपन्यांना अर्ज करूनही अद्याप कोणतीही कंपनी या गावाला सेवा देऊ शकली नाही, त्यामुळेच गाव विक्रीला काढल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गावकऱ्यांचे सुरू आहे 'शोधू कुठे, शोधू कुठे' -
भडजी गावात नेटवर्क नसल्याने मोबाइल शोभेची वस्तू बनली आहे. सर्वांच्या खिशात मोबाइल आहे मात्र, त्याचा उपयोग ना कोणाशी संभाषण करण्यासाठी होतो, ना ऑनलाइन काम करण्यासाठी! कोणाशी संवाद साधायचा असेल तर, उंच ठिकाणी, घराच्या छतावर अथवा महामार्गावर जावे लागते. घराच्या आत मोबाइल नेटवर्क नसल्याने किमान फोन तरी यावा, यासाठी बहुतांश लोकांनी आपल्या दरवाजाबाहेरच मोबाइल ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कोणी स्टँड तयार केले आहे तर, कोणी फळी लावली आहे. कधी-कधी तर मोबाइल घेऊन नेटवर्कच्या शोधात आसपासच्या परिसरात फिरावे लागते