औरंगाबाद -राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यानेच अत्याचार केल्याचा पुनरुच्चार पीडित युवतीने केला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ पीडित महिलेने प्रसार माध्यमांना दिला आहे. त्यामध्ये माझा जबाब मी पोलिसांना दिला आहे. यानंतर जे बोलायचे आहे, ते मी न्यायालयात बोलेन, अशी प्रतिक्रिया पीडित महिलेने दिली आहे.
पीडित महिलेची प्रतिक्रिया तो मी नव्हेच, मेहबूब शेखने स्पष्ट केली होती भूमिका -
पीडित महिलेने तक्रार दिल्यावर हा मेहबूब शेख मी नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी घेतली होती. तातडीने त्यांनी आपला एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर केला होता. विरोध वाढत असल्याने त्यांना मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दुसऱ्यांदा आपली भूमिका जाहीर करावी लागली होती. त्यावेळी पोलीसदेखील स्पष्टपणे हा तोच असल्याचे सांगत नव्हते. पोलिसांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत दोघांचा संपर्क आला नाही, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मात्र पीडिती महिलेने व्हिडिओ जाहीर करत, हाच तो मेहबूब शेख असल्याचे सांगितले.
काय आहे प्रकरण -
नोकरीचे आमिष दाखवून कारमध्ये अत्याचार केल्याची तक्रार एका पीडित महिलेने सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. दोन महिन्यांपुर्वी बीड बायपास रोडवर ट्यूशन चालू करण्यासाठी भाड्याने रुम शोधत होती. त्यावेळी तिची महेबुब शेख यांच्याशी ओळख झाली होती. यादरम्यान महेबुब शेख यांनी शिक्षणाबाबत विचारपूस करुन तुला मुंबईत चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर पीडित महिला आणि शेख यांची दोन ते तीनवेळा भेट झाली. पुढे 10 नोव्हेंबर 2020 रोजी दोघांची फ्लॅटवर भेट झाली. त्यानंतर नोकरी लावण्यासाठी मुंबईला जायचे आहे, असे म्हणत 14 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री नऊच्या सुमारास शेख यांनी जालना रोडवरील रामगिरी हॉटेलसमोर थांबली होती. त्यावेळी शेख हे कारने आले. त्यांनी पीडित महिलेला कारमध्ये बसवून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला नेले. तेथील निर्मनुष्य ठिकाणी कार उभी करुन चालकाच्या सीटवरुन उतरुन ते पाठीमागील सीटवर आले. कारमध्येच त्यांनी जबरदस्ती केली. त्यावेळी महिलेने प्रतिकार करत आरडा-ओरड सुरु केला. तेव्हा शेख यांनी महिलेचे हात आणि तोंड दाबले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली, अशी तक्रार महिलेने पोलिस ठाण्यात दिली होती.
पीडित महिलेशी संपर्क होत नसल्याची चर्चा -
पीडित महिलेला अत्याचार केलेल्या काही संशयितांची छायाचित्रे दाखवण्यात आली होती. त्यावेळी तिने महेबूब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने तक्रारीत दिलेला घराचा पत्ता खोटा असून, पीडिता सध्या गायब असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र बर्ड फ्ल्यूपासून अजून तरी दूर; नागरिकांनी काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला