कन्नड (औरंगाबाद) -देशात सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या चर्मकार समाजातील गटई कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. त्यांची उपासमार थांबावी म्हणून शासनाने तात्काळ गटई कामगारांना आर्थिक मदत जाहीर करून त्याची होणारी उपासमार थांबवावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कन्नड तालुका अध्यक्ष संतोष पुसे यांनी केली आहे.
गटई कामगारांना शासनाने मदत जाहीर करावी, कन्नड चर्मकार संघाची मागणी - टाळेबंदी
टाळेबंदीमुळे गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने गटई कामगारांना मदत जाहीर करावी, अशी मागणी कन्नड चर्मकार संघाचे अध्यक्ष संतोष पुसे यांनी केली आहे.
चर्मकार समाजातील लोक चप्पल बनवून व दुरुस्ती करुन आपले उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊन हे जनतेच्या हिताचेच आहे. पण, टाळेबंदीला दुसरा महिना सुरु झाला आहे. या काळात गटई काम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लोक प्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे अशा लोकांना आर्थिक व जीवनाशयक वस्तुच्या मदतीची गरज आहे. म्हणून शासनाने गटई कामगार व चप्पल व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच शिधापत्रक नसलेल्या कुटुंबांना गहु, तांदूळ व इतर वस्तु देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कन्नड तालुका अध्यक्ष संतोष पुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
हेही वाचा -'ग्राऊंड रिपोर्ट' : पैठणीची मागणी घटल्याने विणकरांवर उपासमारीची वेळ!