औरंगाबाद -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय जिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी पैठणच्या पाचोड परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. पाचोड ग्रामीण रुग्णालय ट्रामा केयर सेंटर येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कोविड-19 हेल्थ सेंटर, चेक पोस्ट आणि शासकीय गोदामाला त्यांनी भेट दिली.
औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता विविध ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या तयारीला वेग आला आहे. पाचोड ग्रामीण रुग्णालयात येथे विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात येत आहे. उपविभागीय जिल्हाधिकारी स्वप्नील मोरे यांनी नव्याने निर्माण होणाऱ्या 30 खाटांच्या कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली. त्यासाठी लागणारी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याची हमी मोरे यांनी दिली.