औरंगाबाद - गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेलेला एक मुलगा वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी पैठण तालुक्यात घडली. नदी पात्रात दोन मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यातील एकजण वाहून गेला तर एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. जिल्हा प्रशासनाने वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेणे सुरू केले आहेत.
पैठणमध्ये गोदावरीत पोहायला गेलाला मुलगा गेला वाहून; शोधकार्य सुरू
दोघे मित्र गोदावरीच्या पात्रात पोहण्यास गेले. त्यांना पोहता येत नसल्याने दोघेही वाहू लागले. मुले वाहून जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एक मुलगा वाहून गेल्याची घटना पैठण तालुक्यात घडली.
फैसल फिरोज शेख (वय १६) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात ५ हजार ७८२ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैठण परिसरातील गोदावरी नदी भरून वाहत आहे. दरम्यान शनिवारी दुपारी शहरातील पॉवर हाऊस भागात राहणारे दोघे मित्र शनी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी पात्रात पोहण्यासाठी गेले. विशेष म्हणजे या दोघांनाही पोहता येत नसल्याचे बोलले जाते. गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पाण्यात उडी मारताच ते वाहू लागले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी गोदापात्रात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी फैसल शेख हा वाहून गेला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. फैसलचा शोध घेणे सुरू आहे. पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने फैसल दूरपर्यंत वाहून गेल्याच अंदाज वर्तवण्यात येत आहे.