औरंगाबाद (वैजापूर) - नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या माफियावर कारवाई करताना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अंगावर वाळू तस्करांनी जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 10 मार्च)रोजी पहाटे लाखणी, ता. वैजापूर येथील शिवना नदीपात्रात घडला. कारवाईसाठी पथकासोबतच्या सुरक्षाकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे तहसीलदार गायकवाड तस्करांच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले.
पाच ते सहा जणांविरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा
या हल्ल्या दरम्यान सुरक्षा रक्षकाने जेसीबीचालकावर सुरक्षा रक्षकाने बंदूक रोखल्यामुळे हल्लेखोर जेसीबी यंत्र सोडून अंधारात पसार झाले. जवळपास अर्धा तास वाळू तस्कर आणि महसूल विभागात समोरासमोर संघर्ष झाला. सुरक्षा रक्षकाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तस्कर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. या कारवाईत पथकाने तस्करीच्या मालकीचे विना क्रमांकाचा एक हायवा ट्रक व जेसीबी यंत्र जप्त करून शिऊर पोलिसांच्या ताब्यात दिले. तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाच ते सहा जणांविरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पथकाला पाहताच हायवा चालकाने धूम ठोकली
वैजापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यामुळे ते एका खासगी वाहनातून सुरक्षा रक्षक आरिफ पठाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन लाखणी शिवारात शिवना नदीपात्रात गुरुवारी पहाटे कारवाईसाठी गेले होते. त्या दरम्यान त्यांना विना क्रमांकाचा हायवा वाहन उभे असल्याचे आढळून आले होते. पथकाला पाहताच हायवा चालकाने धूम ठोकली. नदीपात्रात आणखी वाहने आहेत का यांची शोध मोहीम घेत असताना पथकाला काही अंतरावर जेसीबी यंत्र दिसून आले. कर्मचारी जेसीबीकडे येत असल्याने चालक फरार झाला. पथक जेसीबी जवळ उभे असताना त्याठिकाणी तीन बुलेटवर पाच ते सहा व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी लांबूनच पथकाला कारवाई करू नका अशी विनंती करत होते.