छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Supriya Sule News :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षा आणि युवकांना व्यसन करू नका असा सल्ला दिला, मात्र तो नेमका कोणासाठी होता? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून तर हा सल्ला नव्हता ना? असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. तसंच फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, "आम्ही ड्रग्ज प्रकरणात राजकारण आणणार नाही." पण त्यांनी काहीच केलं नाही. ते स्वतः म्हणाले होते "मी ड्रग्जचे रॅकेट एक्सपोज करेल" मग करा ना, सर्वांना कळू द्या, यामागं कोण आहे? ललित पाटील पळून गेला, त्याचं काय केलं. तसंच "ड्रग्ज प्रकरणात भाजपाचा हात असू शकतो," असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात गुन्हेगारी वाढली : "राज्यात गुन्हेगारी वाढली असून पुण्यासारख्या शहरात कोयता गँग पाहायला मिळाली. बाहेरुन अनेक मुलं-मुली शिक्षणासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये येतात. अनेकांचं पालकत्व माझ्याकडंच आहे. मात्र, गुन्हेगारी वाढल्यानं आता कोणीही सुरक्षित नाही. हे ट्रिपल इंजिन खोके सरकार फक्त कार्यक्रमात व्यस्त असतं. राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना सांगण्यात आली नसावी. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाशिकला होते. मात्र, कांदा प्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत. राज्यात पेपर फुटले हे देखील त्यांना माहिती नसावं. पक्ष आणि घर फोडण्यात व्यस्त असल्यानं यांना सुरक्षिततेचं काहीच वाटत नाही", अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.