छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :Sunil Kawale Suicide Case:मुळचे अंबड तालुक्यातील रहिवासी असलेले सुनील कावळे कामानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातील रामनगर मुकुंदवाडी परिसरात राहत होते. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी ते दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करायचे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, दोघेही बारावी उत्तीर्ण आहेत. नुकतंच मुलीचा विवाह झालेला होता तर मुलगा पुढे न शिकता एका कंपनीत नोकरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. सुनील कावळे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. जिथे आंदोलन, मोर्चे किंवा सभा असायचे त्या ठिकाणी ते आपलं काम सोडून सहभागी व्हायचे. समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे ही लढाई गरजेची आहे असं ते नेहमी सांगत होते.
आरक्षणासाठी घेतली होती रिक्षा:दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून असलेले सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणात सक्रिय सहभाग असावा याकरिता अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र दुसऱ्याची गाडी असल्याने, मालक सांगेल त्यानुसारच काम करावे लागायचे. त्यामुळे आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविता येत नव्हता. अखेर त्यांनी चालकाची नोकरी सोडून स्वतःची रिक्षा घेतली आणि ते चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे आंदोलन, सभा किंवा मेळावा असेल त्यावेळी ते रिक्षा घेऊन, त्या ठिकाणी जायचे आणि आंदोलनात सहभाग नोंदवायचे. सक्रिय सहभाग असताना मनोज जरांगे यांच्या आंदोलनात त्यांनी पाठिंबा दर्शवला. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी एक दिवस आधीच सभा ठिकाणी मुक्काम केला आणि तेथील कामात मदत केली. मात्र, दोन दिवसांपूर्वी ते एक काम आहे असं सांगून मुंबईला गेले आणि तिथून त्यांनी गुरुवारी मध्यरात्री आत्महत्या करण्याबाबत चिठ्ठी लिहिली. तर आपल्या शर्टवर मोठ्या अक्षरात आरक्षण बाबत मजकुर लिहून फोटो काढत स्टेटसवर ठेवत आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. ही वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शुक्रवारी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.