औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी पासून वेगळे झाल्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आरएसएसचे काही लोक वंचितमध्ये असल्याचा आरोप केला होता. मात्र, त्या आरोपांवर खासदार जलील यांनी कुठलेच पुरावे सादर केलेले नाहीत, असे स्पष्टीकरण वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिले. तसेच खासदार जलील हे पत्रकार होते. त्यामुळे त्यांनी पुरावे सोबत ठेवूनच बोलायला हवे, असेही सुजात यांनी म्हटले आहे. सुजात यांच्या उपस्थितीत शहरात युवकांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -ईडीचा पाहूणचार स्वीकारण्यासाठी जाणार, पवारांनी केले स्पष्ट
वंचित आणि एआयएमआयएमच्या युती संदर्भात बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या दारावर ज्यांनी कुलूप लावले आहे, त्यांनीच ते कुलूप उघडावे. कारण, जो शेवटी कुलूप लावतो त्याच्याकडेच चावी असते आणि तोच दरवाजा उघडू शकतो, असा टोलाही त्यांनी खासदार जलील यांना लगावला. तसेच वंचित आणि एमआयएम यांच्यात अजूनही आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत आमचे दरवाजे हे उघडे ठेवलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.