औरंगाबाद - डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षेचा सावळा गोंधळ सुरुच आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीत मोठ्या अडचणी आल्याने नाट्यशास्त्र विभागाचा सकाळी दहा वाजता असणारा पेपर दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 9 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी ऑनलाईन पद्धतीचा फज्जा उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी धावपळ करावी लागली. तर काहींना परीक्षेसाठी मुकावे लागले आहे. पहिल्याचदिवशी झालेली गडबड लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला.
बामु विद्यापीठात परीक्षेचा सावळा गोंधळ, परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी खोळंबळे - bamu exams aurangabad
डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 9 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी ऑनलाईन परिक्षा पद्धतीचा फज्जा उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी धावपळ करावी लागली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षेत विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमधील एक लाख 64 हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. चार जिल्ह्यातील 250 केंद्रांवर सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 या काळात दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात एक लाख 14 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर जवळपास 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार होते. मात्र, ऑनलाईन परिक्षेचा घोळ पाहता अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा देणे पसंत केले. मात्र, त्यातही अनेक समस्या उद्भवत आहेत.
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात असलेला पेपर तीन तास होऊ शकला नाही. सकाळी 10 वाजता परीक्षा असल्याने विद्यार्थी 9 वाजेपासून परीक्षा हॉलमध्ये येऊन बसले. मात्र, दुपारी 1 वाजेपर्यंत परीक्षा सुरू होऊ शकली नाही. ऑनलाईन असलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड न झाल्याने उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तीन तास बसूनही परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला.