आौरंगाबाद - दहावी आणि बारावीचे निकाल ऑनलाईन घोषित झाले आहेत. निकालानंतर पालक आणि विद्यार्थ्यांची मिशन अॅडमिशनसाठी धावपळ सुरू आहे. पुढील शैक्षणिक वर्षात आवश्यक दाखल्यांची जमवाजमव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रावर विद्यार्थी-पालकांची एकच गर्दी पहायला मिळत आहे.
विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची सेतु केंद्रावर गर्दी, प्रशासनाने केली विशेष व्यवस्था
दहावी आणि बारावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक वर्षात अॅडमिशनसाठीच्या प्रक्रियेकरिता आवश्यक दाखल्यांची जुळवाजुळव करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची सेतु सुविधा केंद्रात गर्दी होत आहे.
दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्याने सेतु केंद्रात विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सेतु केंद्र गर्दीने फुलले आहे. वाढणारी ही गर्दी लक्षात घेता सेतु केंद्रात सर्व अर्ज स्वीकृतीसाठी बारा तर दाखला वाटपासाठी 3 खिडक्या कार्यान्वित केल्या आहेत. सेतु कार्यालयात वाढणारी गर्दी लक्षात घेता एकूण १८ ते २० कर्मचारी पूर्णवेळ काम करीत आहेत.
दिवसभरात साधारणपणे ७०० ते ८०० वेगवेगळ्या दाखला मागणीची प्रकरणे सेतु कार्यालयात दाखल होत असून त्यातील साधारणतः दररोज ६०० ते ७०० दाखल्यांचे वाटप केले जात आहे. सेतु कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी प्रचंड गर्दी उसळली असल्याचं दिसून येत आहे.