औरंगाबाद -वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद औरंगाबादमधल्या ज्ञानेश विद्यामंदीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटला. सूर्यग्रहणाबाबत श्रद्धा आणि अंधश्रद्धा वर्तवल्या जातात. मात्र, ग्रहणामागे वैज्ञानिक कारण असून ते विद्यार्थ्यांना समजावे यासाठी अंथश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ग्रहण दाखवून जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी लुटला सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. मात्र, सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास काही ठिकाणी आकाशात दाटलेले ढग काही काळासाठी बाजूला झाले आणि अनेकांना सूर्यग्रहण पाहायला मिळाले. विशेष चष्मे वापरून विद्यार्थ्यांनी ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.
ज्ञानेश विद्यामंदीर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे सूर्यग्रहणाबाबत असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोहिम राबवली. ग्रहण पाहिल्याने अनिष्ठ घडते, गरोदर महिलांवर दुष्परिणाम होतात त्यामुळे ग्रहणात भरून ठेवलेले पाणी देखील सांडून दिले जाते. असे अनेक समज गैरसमज आहेत. ते दूर करुन वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे अंनिसचे शहाजी भोसले यांनी सांगितले.
दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने ग्रहण काळात आभाळात ढग दाटून आल्याने खगोलप्रेमींना ग्रहण पाहता आले नाही. मात्र, काही ढग दूर झाल्याने काही ठिकाणी ग्रहण स्पष्ट दिसले. विद्यार्थ्यांना ग्रहणाची माहिती समजावी यासाठी खगोलप्रेमींनी प्रयोगाचा आधार घेतला. विद्यार्थ्यांना या माध्यमातून ग्रहणाचे महत्व समजण्यास मदत झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. औरंगाबादच्या ज्ञानेश विद्यालयात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.