औरंगाबाद- चोरून दोन बिस्कीटे खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना औरंगाबादच्या निल्लोड गावात घडली आहे. निल्लोडच्या माऊली वारकरी संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातील हा प्रकार आहे. या प्रकरणात पोलिसांनी रामेश्वर महाराज नावाच्या महाराजाला ताब्यात घेतले आहे.
बिस्कीट खाल्ल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील महाराज पोलिसांच्या ताब्यात - संत ज्ञानेश्वर विद्यालय
चोरून दोन बिस्कीटे खाल्ली म्हणून एका चिमुकल्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना औरंगाबादच्या निल्लोड गावात घडली आहे.
दोन बिस्कीटे चोरल्याची शिक्षा या मुलाला अमानुषपणे भोगावी लागली आहे. ११ वर्षीय निरंजन जाधवला भूक लागली म्हणून त्याने आपल्या एका मित्रासोबत मिळून ५ रुपयांचा बिस्कीट पुडा जवळ ठेवला होता. त्यातील २ बिस्किटे घेवून या मुलाने पुडा तिथे ठेवून सुद्धा दिला. मात्र, महाराजांना हे कळताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी निरंजनला बोलावून बेदम मारहाण केली. स्पिकरच्या वायरने निरंजनच्या पाठीवर मारहाण करण्यात आली. यात निरंजनच्या डोक्याला सुद्धा दुखापत झाली. हे सगळं झाल्यावरही त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेले नाही.
रविवारी निरंजनची आई वैशाली जाधव त्याला भेटायला गेल्यावर मुलाने रडत हा घडलेला प्रकार आईला सांगितला. मारहाण इतक्या अमानुषपणे केली गेली की ते सांगतांना तो घाबरत होता. महाराज नेहमीच मुलांना अशी मारहाण करतात, असे निरंजनने सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर निरंजनची आईसुद्धा घाबरली.
याची तक्रार निरंजनच्या आईने पोलिसात दिली. त्यावरून रामेश्वर महाराजाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झालेला प्रकार संतापात केल्याची कबूलीही महाराजांनी दिली आहे. या शाळेत यापूर्वीही मुलांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्याचे कळते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.