महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

12व्या ज्योतिर्लिंग रुपात घृष्णेश्वर मंदिरात महादेवाचा वावर! - घृष्णेश्वर मंदिर व्हिडिओ

देशभरात हिंदू धर्मीय लोक महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी करतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील घृष्णेश्वर याठिकाणी असलेल्या शिवमंदिरात दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

story of grishneshwar temple
घृष्णेश्वर मंदिर अख्यायिका न्यूज

By

Published : Mar 11, 2021, 1:33 PM IST

औरंगाबाद - महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील १२वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो. महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. हर हर महादेवचा गजर परिसरात घुमतो. संपूर्ण वातावरण भक्तिमय होत. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट पाहता मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला आहे.

घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते
अशी आहे अख्यायिका -

घृष्णा आणि सुदेहा अशा दोघी बहिणी होत्या आणि सख्या सवतीही होत्या. मात्र, दोघींनाही मूलबाळ नव्हते. घृष्णा मोठी शिवभक्त होती आणि शंकराची नियमित पूजा व उपासना करत असे. त्याचे फळ म्हणून तिला पुत्र झाला. मात्र, मत्सराने जळत असलेल्या सुदेहाने या मुलाला ठार मारले व नदीत फेकले. घटना घडली तेव्हा घृष्णा शिवपुजेत होती. मुलाला ठार केल्याचे ऐकूनही ती किंचितही विचलीत झाली नाही अथवा तिने पूजा अर्धवटही सोडली नाही. तिचे एकच म्हणणे होते की ज्याने मला पुत्र दिला आहे, तोच त्याचे रक्षण करेल. तिची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि घृष्णेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. घृष्णेच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले तेव्हा तिने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करा, अशी शंकराला विनंती केली. शंकरानेही तिची विनंती ऐकली. घृष्णेच्या नावावरूनच या स्थानाला घृष्णेश्वर, असे नाव पडले.


अशी आहे मंदिर रचना -

लाल सँडस्टोनमध्ये बांधले गेलेले हे मंदिर वास्तू रचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा, विष्णू, गणेश कथाही आहेत. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे शंकर महादेव ज्योतिस्वरूपात स्थित आहेत अशी आख्यायिका आहे. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

मंदिराची जलधारा पूर्वाभिमुख -

इतर प्रमुख ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर मंदिरात काही फरक आहेत. पहिल्या अकरा ज्योतिर्लिंगाची जलधारा पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे मंदिराला प्रदक्षिणा मारणे शक्य होत नाही. मात्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्याने या मंदिराला पूर्ण प्रदक्षणा घातली जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी लाखो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल होतात. महाशिवरात्रिला शिवाचे दर्शन व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातील विविध भागातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होतात.

घृष्णेश्वराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही यात्रा -

महादेवाचे एकूण बारा ज्योतिर्लिंग देशात आहेत. या ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी भाविक यात्रा करतात. औरंगाबादचे घृष्णेश्वर त्यापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. जोपर्यंत घृष्णेश्वराचे दर्शन होत नाही तोपर्यंत बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही, असे समजले जाते. त्यामुळेच भाविक ज्योतिर्लिंगाच्या यात्रा पूर्ण करण्यासाठी येत असतात. औरंगाबाद सह राज्यातून आणि देशातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details