औरंगाबाद - दारू पिऊन सतत आईला मारहाण करणाऱ्या जन्मदात्या बापाचा मुलाने खून केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. राजेश रामकृष्ण मुसळे (५५, रा. साईनगर, सिडको वाळूज महानगर) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश मुसळे यास अडीच महिन्यांनंतर अटक केली आहे.
पत्नी, मुलास करत असे मारहाण -
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, राजेश रामकृष्ण मुसळे (५५, रा. साईनगर, सिडको) यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याने ते नेहमी दारू पिऊन त्यांची पत्नी छाया मुसळे यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे. यामुळे मुलांनी त्यांना वेळोवेळी समजविण्याचा प्रयत्न केला होता. ७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राजेश मुसळे यांनी दारू पिऊन पत्नी छाया मुसळे व मुलास शिवीगाळ करून मारहाण केली.
दारू पिऊन ते खाली पडल्याचे केला बनाव -
त्यांच्या नेहमीच्या या सवयीमुळे ऋषिकेश मुसळे याने रागाच्या भरात वडील राजेश मुसळे यांचे हात धरून लाकडी दांडा तसेच बुक्क्यांने त्यांच्या छातीवर बेदम मारहाण केली. या घटनेत ते बेशुद्ध पडल्याने घरच्यांनी त्यांना उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. यावेळी राजेश मुसळे हे दारू पिऊन खाली पडल्याचे त्यांचा मुलगा ऋषिकेशने डॉक्टरांना सांगितले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी (७ एप्रिल) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राजेश मुसळे यांचा मृत्यू झाला होता.