औरंगाबाद - महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड न्यायालयाने ( Sillod court on Minister Abdul Sattar ) दणका दिला असून शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहे. महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव विधानसभा 104 निवडणूक सन 2019 मधील नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये मालमत्तेचे विवरण, खरेदी मूल्य, शेअर्स व शैक्षणिक अर्हता यांची खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याप्रकरणी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
डॉ. अभिषेक हरदास, पुणे व सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली, सिल्लोड यांनी 27 ऑक्टोंबर 2021 रोजी सिल्लोड न्यायालयात न्यायमूर्ती एस, एस. धनराज यांच्याकडे संयुक्त याचिका दाखल करून या प्रकरणात सीआरपीसी 200 व आयपीसी 199, 200 अन्वये कारवाई करून, अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेमध्ये न्यायालयाने तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकून सी.आर.पी.सी 202 अंतर्गत पोलीस चौकशीचे आदेश बुधवारी दिले. सदर प्रकरण गंभीर असून पोलिसांनी योग्य तपास करणे गरजेचे असल्याचे डॉ अभिषेक हरिदास यांनी म्हटलं.