औरंगाबाद -सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशी भाजपला भीती आहे. या भीतीने भाजप पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून आगामी काळातील आपली भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी कळवली आहे.
भाजप पदाधिकारी सुनील मिरकर यांची प्रतिक्रिया गेली अनेक वर्षे सिल्लोडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मोठा संघर्ष करून भाजप पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केले. मात्र, आता सत्तार जर शिवसेनेत जाऊन सिल्लोडमध्ये निवडणूक लढवणार असतील तर तसे होऊ देणार नाही. सिल्लोड हा भाजपचा मतदारसंघ असून ही जागा भाजपनेच लढवावी. ही जागा जर सेनेला सोडणार असतील तर सिल्लोडचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंड करून निवडणूक लढवतील, असा इशारा सिल्लोड येथे झालेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यानी स्वतः च्या पक्ष नेत्यांना दिला.
हेही वाचा- किल्ले लग्न, समारंभांसाठी भाड्याने देण्याच्या बातमीवर पर्यटन विभागाचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत त्यावेळचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाशी बंडखोरी केली. इतकेच नाही तर लोकसभेत पक्ष विरोधी प्रचार केला. त्यानंतर अब्दुल सत्तार भाजपवासी होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांना भाजप प्रवेश देऊ नका, अशी एकमुखी मागणी केली. त्यामुळे सत्तार यांचा पक्ष प्रवेश टळला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत सत्तार थेट त्यांच्या गाडीवर स्वार झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ माजली होती. त्यामुळे सिल्लोडच्या स्थानिक कार्यकर्त्यानी पुन्हा सत्तार पक्षात नको, असा नारा दिल्याने अब्दुल सत्तार यांनी अचानक शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले.
हेही वाचा- पानसरे हत्या प्रकरण : अटक केलेल्या तीन आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
युतीच्या जागावाटपात सिल्लोडची जागा सेनेला सुटण्याची शक्यता पाहता, सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तातडीची बैठक घेत सिल्लोडची जागा भाजपच्या हक्काची आहे ती सेनेला देऊ नका अशी मागणी केली. जर पक्षाने सिल्लोडची जागा सेनेला दिली तर पक्षातील कार्यकर्ते बंड करून भाजपचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करतील असा इशारा बैठकीत देण्यात आला. आता भाजप काय भूमिका घेणार याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- 'हा तर शिवबांचा, मावळ्यांचा अपमान; गड-किल्ल्यांना हात लावाल तर याद राखा'