औरंगाबाद - दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करून वाईट प्रवृत्तीचा नायनाट केला जातो. मात्र औरंगाबादेत शूर्पणखेच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पत्नी-पीडित पुरुष संघटनेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून शूर्पणखा दहन करत समाजातील वाईट वृत्तीच्या महिलांचे प्रतिकात्मक दहन केले जाते. पत्नी पीडित आश्रमातील शूर्पणखा दहनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..
औरंगाबादेत पीडित पुरुषांकडून शूर्पणखा दहन 'देशात असलेले कायदे महिलांच्या बाजूने आहेत. त्यामुळे या कायद्यांमध्ये बदल करत, महिलांप्रमाणे पुरुषांनादेखील कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक वेळी पुरुषच अत्याचारी असतात असे नाही. काही महिलादेखील अत्याचारी असतात, त्या महिलांमुळे समस्त महिलांचे नाव बदनाम होत असल्याने अशा वाईट वृत्तीच्या महिलांमध्ये शूर्पणखेचा वास असतो. त्यामुळे शूर्पणखा दहन करण्याचा उपक्रम राबवल्याचे' पत्नी-पीडित संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारे यांनी सांगितले.
वाईट वृत्तीच्या महिलांचा निषेध
'दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन देशभर केले जाते. मात्र रावण वाईट का झाला? तर तो शूर्पणखेमुळे. शूर्पणखेने रावणाचे कान नसते भरले तर सीतेचे हरण झाले नसते आणि रामायण घडलेच नसते. अशा अनेक शूर्पणखा आज आहेत. ज्यांच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अशा शूर्पणखांचे दहन करून वाईट वृत्तीच्या महिलांचा निषेध करण्यासाठी ही प्रथा सुरू केल्याचे' फुलारे यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यातील महत्त्वाच्या दसरा महोत्सवांवर एक नजर; 'ईटीव्ही भारत'वर पाहा लाईव्ह...
सकाळी अकराच्या सुमारास पत्नी-पीडित आश्रमात शूर्पणखेचा पुतळा उभारला जातो. या पुतळ्यावर महिलांच्या मेकअपचे सामान, मोबाईल, चैनीच्या वस्तू ठेवल्या जातात. पत्नी-पीडित पुरुषांकडून विडंबन गाणं सादर करत विधिवत पूजा करत शूर्पणखेचा पुतळ्याचे दहन केले जाते. पत्नी-पीडित पुरुष हातात महिलांसाठी तयार केलेल्या कायद्याच्या विरोधी फलक लावत, वाईट वृत्तीच्या महिलांविरोधात घोषणाबाजी केली गेली. देशात महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत, त्या कायद्यांचा महिला गैरवापर करतात. महिला पोलिसांत तक्रार घेऊन गेली तर तिची तक्रार तत्काळ घेतली जाते. मात्र पुरुष तक्रार घेऊन गेला तर त्याची तक्रार घेतली जात नाही. त्यामुळे समजात असलेली स्त्री-पुरुष समानता कायद्यातदेखील असायला हवी. महिलांप्रमाणे पुरुषांनाही कायद्याचे रक्षण द्या, अशी मागणी पत्नी-पीडित संघटनेतर्फे करण्यात आली.
जिल्ह्यात नऊ हजार पुरुषांच्या तक्रारी..
आजपर्यंत पत्नी-पीडित पुरुषांच्या नऊ हजार तक्रारी संघटनेकडे आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष फुलारी यांनी दिली. 'पुरुषांकडून पैसे काढण्यासाठी अनेक ठिकाणी महिला खोट्या तक्रारी देत आहेत. या खोट्या तक्रारींमुळे पुरुष आणि त्याचे कुटुंबीय उद्धवस्त होत आहेत. तक्रार झाल्यावर त्याची शहानिशा करून कारवाई व्हायला हवी. मात्र तसे होत नसल्याने पुरुषांच्या आत्महत्येत वाढ होत असून ही चिंतेची बाब आहे. कोणाचेही कुटुंब उद्धवस्त होऊ नये, अशी आमचीही इच्छा आहे. जे पुरुष वाईट वृत्तीचे आहेत त्यांच्यावर कारवाई योग्यच आहे. मात्र, ज्या महिलांची वृत्ती वाईट आहे. त्यांच्यावर देखील कडक कारवाई कायद्याने झाली पाहिजे. तरच पुरुषांवरील होणारे अत्याचार कमी होतील,' अशी मागणी फुलारे यांनी केली.
हेही वाचा -देशातील सर्व नागरिकांची 'हिंदू' हीच ओळख - सरसंघचालक