औरंगाबाद- महापालिकेचा प्रारूप गोपनीय आराखडा वेळेअधीच बाहेर आला आहे. सोशल मीडियावर हा आराखडा आल्याने इच्छुक नाराज झाले आहेत. तर या प्रकरणी अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ ( Shivsena MLA Sanjay Shirsat ) यांनी मुंबईला जाऊन राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी ज्या लोकांच्या मर्जीतील हा प्रारूप आराखडा तयार केला आहे आणि शहरात सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात सोमवारी ( दि. 30 मे ) रोजी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त उविंदर पाल सिंग मदान यांना निवेदन दिले. याप्रसंगी राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील पालिकेचा प्रारूप आराखडा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. ही बाब चुकीची आहे त्यामुळे या प्रकारामध्ये कोणत्याही अधिकारी असेल तर यांची गय केली जाणार नाही, संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेशही राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलेले आहेत, असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणूक गेल्या वर्षाभरापासून रखडलेली आहे. ही महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा 17 मेपर्यंत पाठविण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांना देण्यात आले होते. पण, आराखडा तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नकाशा मिळण्यास विलंब झाल्यामुळे ही डेडलाईन हुकली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेली लोकसंख्या व महानगरपालिकेकडे असलेल्या लोकसंख्येत तफावत आहे. हा पेच सोडविण्यासाठी महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना मुंबई येथील कार्यालयात बोलविण्यात होते.