औरंगाबाद- पुढील पाच वर्षात शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे पक्के आहे. शिवसेनेशिवाय राज्यात सरकार होऊ शकत नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे यात शंका असू नये, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत केले आहे.
शिवसेना नेते दिवाकर रावते हेही वाचा -बसची बैलगाडीला धडक: शेतकरी गंभीर जखमी, औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात
राज्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक ठिकाणी मदत केंद्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर जाऊन शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज ना उद्या आमचीच सत्ता येणार आहे. त्यावेळी आता सुरू असलेले दौरे कामी येतील, असे दिवाकर रावते यांनी सांगितले.
हेही वाचा -सर्व काही जुळवून घेण्यासाठी वेळ लागतोय - बाळासाहेब थोरात
दिवाकर रावते यांनी औरंगाबादेत गंगापूर तालुक्यातील मदत केंद्रांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. शिवसेनेशिवाय कोणताही पक्ष राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकत नाही. भागवत यांनी कोणाला उद्देशून बोलले हे पाहावे लागेल. त्यांनी आपल्याच पक्षातील लोकांचे कान टोचले असतील तर माहीत नाही, असे रावते यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे नेते मदत केंद्राला भेट देऊन त्याबाबतचा अहवाल मातोश्रीवर सादर करणार आहेत. शेतकरी नुकसानबाबत सर्वे झाला पाहिजे. सध्या दोन प्रकारच्या याद्या केल्या आहेत ज्यामध्ये विमा काढलेले आणि विमा न काढलेले अश्या याद्या आहेत. ज्यांनी विमा काढला त्यांच्यासाठी विमा कंपनीकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तर, ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांच्यासाठी शासन दरबारी मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.
2016 मध्ये झालेल्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या लोकांना त्याचा फायदा मिळावा यासाठी मदत करणार आहे. कर्जमाफीसोबत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ केले आहेत. सर्व बँकांना तोंडी मागणी केली की कर्ज परत मागण्याच्या नोटीस काढू नका. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव करणारं धोरण तयार करायला पाहिजे, अशी शिवसेनेची भुमिका असल्याचे देखील दिवकार रावते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.