औरंगाबाद - दिल्ली शेतकरी आंदोलनातील टूलकिट प्रकरणी बंगळुरू येथील दिशा रवी अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून बीड येथील शंतनू मुळूक यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. टूलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ईमेल आयडी शंतनूची असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळावा, यासाठी शंतनू मुळूक याने औरंगाबाद खंडपीठात अर्ज सादर केला आहे.
खंडपीठात होणार सुनावणी -
शंतनु मुळूकच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. शंतनूच्यावतीने ॲड. सतेज जाधव बाजू मांडणार आहेत. शंतनूवर 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुपारी चारच्या सुमारास सुनावणी पूर्ण होईल, अशी माहिती ॲड. सतेज जाधव यांनी दिली.
काय आहेत आरोप -
शेतकरी आंदोलासंबंधी सोशल मीडियावरून पोस्ट करताना टूलकिटचा (toolkit) वापर झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सायबर सेलने बंगळुरातील एका २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्तीला अटक केली आहे. दिशा रवी असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही टूलकिटचा वापर केला होता. त्यामुळे याची जगभर चर्चा झाली होती. दिशा रवीला दिल्ली न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दिशाची सहकारी असलेली मुंबईतील वकील निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात दिल्लीत अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. यातील शंतनू हा बीडचा असून तो सध्या फरार आहे. शंतनूच्या शोधात दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्री बीडमध्ये जाऊन त्याच्या चाणक्यपुरी भागातील घरी वडील आणि कुटुंबियांची तीन तास चौकशी केली. त्यानंतर पथकाने त्याच्या वडिलांना घेऊन औरंगाबादच्या घरी देखील चौकशी केली.
शंतनू लॉकडाऊनपासून होता बीडमध्ये -
शंतनूचे प्राथमिक शिक्षण बीडमध्ये झाले असून त्याने अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्याचे वडील हे बीडचे माजी नगराध्यक्ष आहेत तर, चुलत भाऊ सचिन मुळूक हे शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख आहेत. शंतनू पर्यावरणवादी असून इंजिनिअरिंगनंतर त्याने काही दिवस औरंगाबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरी केली आणि नंतर तो पुण्याला गेला. लॉकडाऊनपासून तो बीडमध्ये होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.