औरंगाबाद- वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी,त्यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शांतिगिरी महाराजांनी आपली भूमिका जाहीर केली.
शांतिगिरी महाराजांची लोकसभेच्या रिंगणातून माघार, मतदान जनजागृती करणार - loksabha election
वेरुळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाराजांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी, त्यांनी अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केला नसल्याचे स्पष्ट केले.

महाराजांनी यापूर्वी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास १ लाख २३ हजार मते मिळवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये भक्तांच्या सांगण्यावरून बाबांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. पण, या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. त्यामुळे महाराज निवडणूक लढवतील, अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची निवडणूक लढवायची नसून आपण फक्त मतदान जनजागृती करणार असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले.
इतकेच नाही तर बाबांचा भक्त परिवार निवडणुकीच्या काळात मतदान जनजागृती करणार असून घराघरात जाऊन मतदान मोठ्या संख्येने करा, असे आवाहन करणार आहे. त्याचबरोबर उमेदवार कसा असावा, याबाबतचे निकषही मतदारांना समजून सांगितले जाणार आहेत. उमेदवार हा शिक्षित, सभ्य आणि इमानदार असावा, असे निकष बाबाजींनी लावले आहेत. शांतिगिरी महाराज यांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी भेट दिली असून दोघांनीही आशीर्वाद मागितले असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले. तरी ९ एप्रिल नंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असेही शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.