पैठण (औरंगाबाद) - अवघे वीस वारकरी घेऊन संत एकनाथ महाराज पादुकांचे आज (मंगळवारी) पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने झालेले हजारोच्या संख्येने पाई चालत जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा आज खंडित झाली, अशी खंत पांडव महाराज पालखी वाले यांनी व्यक्त केली.
संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूर येथे 8 मानाच्या पालखीमध्ये मोडली जाते. या पालखीला साडेचारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी संत एकनाथ महाराज यांच्या पदकाची पालखी घेऊन हजारोच्या संख्येने वारकरी पैठण ते पंढरपूर असा दोनशे किलोमीटरचा पायी प्रवास दरवर्षी करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व मानाच्या दिंड्या पंढरपूरला येणार आहेत. मात्र, यात प्रत्येक दिंडीला मानाचे 20 ते 50 असे वारकरी घेऊन येण्याची ताकीद प्रशासनाने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथ मंदिर येथे गेल्या दोन तारखेपासून विसावा घेत असलेल्या पालखीचे प्रस्थान आज (मंगळवारी) पंढरपूरच्या दिशेने झाले.