खासदार संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट नेते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sanjay Raut :अमित शाह हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या दौऱ्याला तसंच कॅबिनेटला कुठलंही गालबोट लागू नये, यामुळे जालन्यातील जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्याचे आदेश दिल्लीतून आले होते. म्हणून सरकारला जरांगे पाटलांचं उपोषण संपवावं लागलं, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय. तसंच अमित शहांचा दौरा आमच्या स्वागताच्या तयारीमुळे रद्द झाला असं म्हणत, नाम काफी है, डर काफी है, आम्ही इकडे बसतो तरी मुंबईत चिंता आहे. आमचा पक्ष काढला, चिन्ह काढलं तरी आमची हिंमत कायम आहे, अशी जोरदार टीका राऊतांनी केलीय. मंत्रिमंडळ बैठक म्हणजे मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून जुन्या घोषणांचं काय झालं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.
शाह यांच्या स्वागताला आलो :आपल्या दौऱ्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, मी अमित शाह यांचं स्वागत करण्यासाठी आलो होतो. देशाचे आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा करणार होतो, म्हणून आमच्या 'पक्षाची कॅबिनेट' घेऊन भेट घेण्यासाठी आलो आहे. मराठवाड्याचा अमृत काळ फक्त कागदावर आहे. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आंदोलन संपवण्याचे आदेश दिल्लीतून मिळाले, म्हणूनच मुख्यमंत्री आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री पळून गेले. सरकार अडचण पाहून पळ काढत असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केलीय. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व हॉटेल बुक केली आहेत. मात्र हा खर्च कोणासाठी केला, याचं उत्तर द्यावं लागेल. अमित शाह आले नाहीत हा शहाणपणाचा निर्णय आहे. आता सरकार येत आहे, ते मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी येणार आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय.
जवान हुतात्मा झाले मात्र गांभीर्य नाही : जम्मू काश्मिरमध्ये सैन्याचे 3 अधिकारी हुतात्मा झाले असताना, पंतप्रधान स्वतःच्या कार्यालयात स्वतःवर फुलं उधळत होते. गृहमंत्री चाकूरकर यांनी शर्ट बदलला तर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. इकडे पंतप्रधान आणि भाजपा उत्साहात जल्लोष साजरा करतात. जे हुतात्मा झाले ते भारताचे सुपुत्र होते. हाच यांचा सनातन धर्म आहे का? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. अंतर्गत सुरक्षा ही राजनाथ सिंह यांची जबाबदारी आहे. राज्यात आशीच परिस्थिती आहे, जो निकाल चाळीस दिवसांमधे लावला पाहिजे तो अद्याप लागलेला नाही. सहा महिन्यांपूर्वी सरकार बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं सांगितलं. यांची कामं पण बेकायदा आहेत. शासन आपल्या दरी कार्यक्रमात फक्त पैसे उधळले जात आहेत. स्वतःच्या कार्यकर्त्यांना कामं दिली जात आहेत. याचा जाब द्यावा लागेल अशीही टीका संजय राऊत यांनी केली.
दुष्काळ असताना खर्च कशाला :हे सरकार थाटामाटात येणार आहे. दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक प्रश्न आहेत. यांच्यावर करण्यात येणारा खर्च इकडे का करत नाहीत, उद्याच्या बैठकीच्या पोपटपंचीकडे आमचं लक्ष राहणार आहे. 2016 मध्ये बैठक झाली. त्यात अनेक घोषणा झाल्या, त्यांचे काय झालं? दुष्काळी परिस्थिती आहे. सरकार उशीर करत नाही, तर ते काहीच करत नाहीत. 885 शेतकरी आत्महत्या करतात, बीडमध्ये 200 शेतकरी आत्महत्या करतात, या भागातील लोकांची तिरडी बांधायची आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. कॅबिनेटच्या पत्रकार परिषदेला आपण पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी आपल्याला पोलिसांनी हजर राहू दिलं तर असं करता येईल असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.
हेही वाचा :
- Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही का? संजय राऊतांचा सरकारला सवाल
- Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिंदे चंद्रावर देखील बैठक घेऊ शकतात - संजय राऊत
- Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप