मोदी विष्णूचे 13 वे अवतार असतील तर मग बॅलेट पेपरला का घाबरता?, संजय राऊतांचा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sanjay Raut On BJP :छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. "भारतीय जनता पार्टीचे प्रमुख लोक मोदीजींना विष्णूचा 13 वा अवतार मानतात. प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यात असल्याचं ते सांगतात, तर मग तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाहीत. तसंच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत, तुम्हाला प्रभू श्रीरामदेखील वाचवणार नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकारविरोधात रोष वाढतोय : पुढं ते म्हणाले की, कालच ईडी पथकाला मारहाण झाल्याची माहिती समजली. ईडी पथकाला मारहाण म्हणजे लोकांचा संताप. असाच रोष ईव्हीएमबाबत बाहेर येणार आहे. मतदारांना मतदान प्रक्रियेवर विश्वास नसताना तुम्ही कोणती लोकशाही लागू करता? ईव्हीएमच्या माध्यमातून हुकूमशाही सुरू आहे. आतापर्यंत 19 लाख ईव्हीएम चोरीला गेल्या, त्या कुठे गेल्या? हे संशयास्पद आहे. मध्य प्रदेशच्या निकलानंतर शंका बळकावल्या असल्याचाही दावा त्यांनी केला.
आमचा प्रेमभंग झालाय :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या प्रेमात पडले आहेत. आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो, पण आमचा प्रेमभंग झाला. आता हे प्रेमात आहेत. त्यांचं हे प्रेम फार काळ टिकणार नाही. सत्ता गेली की प्रेम जातं. आम्ही 25 वर्ष भाजपासोबत काढली. त्यामुळे आम्हाला भाजपासंदर्भात सर्व माहीत आहे. तसंच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, यांच्यासारखा लुटला नाही, अशी टीकाही राऊतांनी केली.
महाराष्ट्र जपान नाही :मंत्रीगिरीश महाजन म्हणतात लवकर राज्यात भूकंप होईल. मात्र, सारखे भूकंप व्हायला हा महाराष्ट्र आहे, जपान नाही. ईडीचा वापर करणं म्हणजे भूकंप नाही. मर्द असाल तर ईडी आणि पोलीस बाजूला ठेवून मैदानात या. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक मध्ये रोड शो करणार आहेत, त्यांना फक्त रोड शो आणि प्रचार करणं हेच काम आहे, परंतू तुम्ही मणिपूरला का जात नाही? काश्मिरी पंडितांच्या छावणीला भेट का देत नाही? असा खोचक सवालही राऊतांनी केला.
कुणीही मागच्या दारानं भाजपाला मदत करणार नाही : उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतली जात आहे. मराठवाड्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना (ठाकरे गट) एकत्र लढतील. तसंच प्रकाश आंबेडकर सकारात्मक असून कुणीही मागच्या दाराने भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. तसंच आमचा फॉर्म्युला ठरलाय. कॉंग्रेस सोबत चांगली बोलणी झाली असून 2 ते 4 दिवसात दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा -
- संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे तिळमात्र विचार उरले नाहीत-रवी राणा
- भाजपानं राम मंदिराचं मंगल कार्यालय करुन ठेवलंय; संजय राऊतांचा घणाघात
- अयोध्येत पापी लोकांना बोलावलं नाही; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल