छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :कोल्हापुरात दंगल होणे, राज्याला शोभणारे नाही. कर्नाटकात बजरंगबली चालले नाही म्हणून औरंगजेब आणला गेला. अनेक शहरात औरंगजेबला का जिवंत करत आहात? यांचे हिंदुत्व इतके कमजोर आहे की, यांना मुघलांचे प्रतीक घ्यावे लागतात. कोल्हापुरात दंगलीत 60 टक्के बाहेरचे होते, हिंदुत्ववादी मोर्चात बाहेरचे लोक आणतात, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त झाली आहे. दंगली घडवण्याचा इतिहास कुणाचा आहे बघा, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
पोलिसांचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी :राहुल नार्वेकरबाबत मेरिट सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यापुढे कुणालाही जाता येणार नाही. माझा नार्वेकरांवर विश्वास नाही, मात्र त्या खूर्चीवर आहे. तुम्ही पोलीस विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरत आहात. निवडणूक आयोगाने केलेला निर्णय हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तो विकल्या गेलेला आहे. 90 दिवसांत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल, वेळकाढूपणा करू नये, 90 दिवसांनी आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
23 जून रोजी बैठक :23 जूनला देशातील प्रमुख पक्षांची बैठक आम्ही पाटण्याला बोलावली आहे. सर्व देशभक्त पक्ष उपस्थितीत राहतील. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे उपस्थित असतील. पुढची राजकीय लढाई तिथून ठरेल. पुढच्या टप्प्यात एकही राज्य भाजप जिंकणार नाही, असे राऊत यांनी सांगितले आहे. शरद पवार औरंगाबाद म्हणतात ते सध्या कायदा पाळत आहेत. आम्ही बेफाम आहोत, आम्ही संभाजीनगर म्हणणार, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.