औरंगाबाद :शहरात ठाकरे गटाचा शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. चाळीस गेले पण यांना निर्माण करणारा शिवसैनिक आमच्याकडे आहे. यांचा बाप कोण, नेहमी मोदींचे नाव घेता, ते तुमचे बाप आहेत का, हे सांगा अशा भाषेत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
मेळाव्याकडे शिवसैनिकांची पाठ : औरंगाबाद शहरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होता. या मेळाव्यात मात्र रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या. यावर संजय राऊत कार्यकर्त्यांना संबोधन करत त्यांचे कान टोचले. आधी लोक म्हणत होते शिवसेना मुंबई ठाणे पुढे जाणार नाही पण बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना संघटना किंवा पक्ष नाही तो विचार होता. हा विचार सर्व सीमा पार करून तो सर्वत्र पोहचला आहे. आज आपल्याकडे पक्षाचे नाव नाही, चिन्ह नाही संघर्ष सुरू आहे. तरी आपल्याला प्रतिसाद मिळतो. कारण बाळासाहेबांनी विचार पेरला असल्याचे राऊत म्हणाले. भाषण सुरू झाल्यावर कधी थांबायचे ते समजले म्हणजे तो नेता. शिवसेना म्हणजे एक धगधगता इतिहास आहे. शिवसेनेला 38 वर्षे झाली आहेत. आपला इतिहास पाहताना आपल्याकडे किती भूगोल राहिला ते पाहिले पाहिजे. याआधी गॅलरी कधी रिकामी नव्हती आज आहे, याचे आत्मचिंतन केले पाहिजे.
राजपूत आहे म्हणून शिवसेना : कार्यक्रमाला फक्त पदाधिकारी आले कार्यकर्ते नाहीत हे का झाले. कार्यकर्ते का आले नाहीत. या मेळाव्याला खैरे आहेत, दानवे आहेत, घोसाळकर आहेत. शंभर गद्दार गेले जाऊ द्या. पण एखादा राजपूत राहिला तरी शिवसेना राहील. एक सूर्य एक चंद्र आणि एक शिवसेना. दुसरी शिवसेना होऊ शकत नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली. याचबरोबर त्यांच्या बोलण्यावरुन त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. मी शिव्या देतो असे म्हणतात. मी परखडपणे माझे मत मांडत असतो. त्या त्यांना शिव्या वाटत असतील, असे संजय राऊत म्हणाले.
चारजण असेल तरी पुढे जाऊ : जे गेले ते परत निवडून येणार नाहीत याचा विचार करा. आतापर्यंत जे शिवसेनेतून गेले ते पुन्हा परत दिसले नाहीत. अनेकजण उमेदीच्या काळात गेले त्यांचे नामोनिशाण मिटले आहे. आम्ही तरुण असल्यापासून पाहतो. आमचे आयुष्य शिवसेनेत गेले. अनेक प्रसंग पाहिले ऐकले. एक वेळ अशी होती की सगळे जनता पक्षात जात होते. सगळे पक्ष संपतील असे वाटत होते. त्यावेळी शिवसेना पक्ष विलीन करा,असे म्हटले जात होते. त्यावेळी बाळासाहेबांनी शांतपणे सांगितले की, बाळासाहेबांनी रक्त सांडून पक्ष उभा केला. ज्यांना जायचे त्यांनी जावे. चारजण घेऊन आम्ही पुढे जाऊ असे म्हणत शिवसेना संकटकाळातून बाहेर काढली.