औरंगाबाद - कोरोनामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीतही चोरीची एक घटना समोर आली आहे. घरमालकासमोरच चोरांनी चक्क चंदनाचे झाड चोरण्याची हिंमत केली. चोरांना हकलण्याचा प्रयत्न केल्यावरही ते जात नसल्याने बंगल्याच्या डॉक्टर मालकाने चक्क चोरांचा व्हिडिओ तयार केला.
पुष्पनगरीत घडला प्रकार -
पुष्पनगरी भागात राहणारे डॉ. विवेक घारापुरे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरटे दाखल झाले होते. आवाज झाल्याने ते झोपेतून उठले आणि हातात बॅटरी घेऊन त्यांनी परिसरात पाहिले असता दोन चोरटे चंदनाचे झाड कापत होते. त्यांच्या दिशेने बॅटरीचा उजेड करून देखील चोरटे झाड कापत होते. घारापुरे यांनी त्यांना हटकले देखील. मात्र, त्याचा काहीच परिणाम चोरांवर झाला नाही. हटकल्याने, बॅटरी मारल्याने परिणाम होत नसल्याने हताश झालेल्या घारापुरे यांनी शेवटी सर्व चोरीची घटना मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली.