छत्रपती संभाजीनगर :वाशिम तालुक्यातील सुशीलकुमार दिलीप थोरात (वय 38), पत्नी बबीता (वय 36)आणि मुलगी अद्विती (वय 8) यांच्यासोबत शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दर्शन घेऊन ते परतत होते. तेव्हा समृद्धी महामार्गाच्या शेंद्रा एमआयडीसीतील जंक्शनचे काम सुरू असलेल्या भांबर्डे शिवारात कारवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी डाव्या बाजूला खाली तीस फूट जाऊन पडली. सुशील कुमार स्वतः गाडी चालवत होते, त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी बबीता ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आठ वर्षाची मुलगी अद्विती ही किरकोळ जखमी झाली आहे.
शेतकऱ्याने दिली माहिती :समृद्धी महामार्गावर जात असताना गाडीवरच नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाला. यावेळी जवळच गोठ्यात काम करत असलेल्या श्रीकांत पठारे या तरुणाने हा अपघात पाहताच, ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी जखमींना तातडीने मदत करत पोलिसांना याबाबत माहिती दिली. करमाड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत जखमींना रुग्णवाहिनीद्वारे घाटी रुग्णालयात हलवले. तर सुशीलकुमार यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी वाशिमला पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी करमाड पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.