उभ्या ट्रकला खासगी बस धडकल्यानं भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधे चार महिन्यांच्या बालकाचादेखील समावेश असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तर अपघातात वीस जण जखमी झाले आहेत. हा अपघात वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर झाला.
उभ्या ट्रकला खासगी बस धडकली असल्यानं हा अपघात झाला. वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कळाली आहे. समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून सातत्यानं अपघात घडत आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्ण चक्काचूर-नाशिक येथील काही भावीक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर सर्वजण नाशिककडे निघाले असता नागपूर-मुंबई महामार्गावरील वैजापूर जांबरगाव शिवारातील टोलनाक्यापासून काही अंतरावर उभ्या ट्रकवर ही गाडी धडकली. धडक इतकी भीषण होती की चालकासह बारा जणांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये चार वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. त्यानंतर स्थानिकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्ण चक्काचूर झाला होता. वैजापूर पोलिसांसह रुग्णालयाला याबाबत माहिती कळल्यानंतर पाच ते सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यात बारा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. वीस जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहे. यातील १४ जणांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
अशी आहेत मृतांची नावे- तनुश्री लखन सोळसे (वय ५) , संगीता विकास अस्वले (वय ४०), अंजाबाई रमेश जगताप (वय ३८), रतन जगधने (वय ४५), कांतल लखन सोळसे (वय ३२), रजनी गौतम तपासे (वय ३२),हौसाबाई आनंदा शिरसाट (वय ७०), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय ५०), अमोल झुंबर गांगुर्डे (वय ५०), सारिका झुंबर गांगुर्डे (४०), मिलिंद पगारे (वय ५०) आणि दीपक प्रभाकर केकाने (वय ४७) अशी अपघातामधील मृतांची नावे आहेत.
आरटीओनं अडविला होता ट्रक-स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीओच्यावतीने रात्री साडेबाराच्या सुमारास समृद्धी महामार्गावर एक ट्रक अडवण्यात आला. ट्रक बाजूला घेत असताना मागून आलेली टेम्पो ट्रॅव्हलर या ट्रकवर आदळला. अपघात इतका भीषण होता की त्याच्या आवाजानं आसपासच्या गावातील लोकांना त्याची तीव्रता कळाली. स्थानिकांनी घटनास्थळी गाव घेतला असता बसमधून आरडाओरड आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. त्यात एका लहान मुलांच्या किंचाळण्यानं सर्वांचं हृदय पिळून टाकलं. कारण त्याचे आई-वडील घटनास्थळावरच मृत पावले होते. तो रडून आई-वडिलांना बोलवत होता. या अपघातानंतर सर्व जखमी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याआधीही समृद्धीवर बसच्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला होता, त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी सरकार उपाययोजना कधी करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
रात्री १२ वाजता अपघात झाला. अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. टेम्पोमध्ये ३५ जण प्रवाशी होते. गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे-पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया
अपघातात जखमींची नावे - दगू सुखदेव म्हस्के, गौतम भास्कर तपासे, कार्तिक ( लहान मुलगा), शांताबाई नामदेव मस्के, दुर्गा (लहान मुलगी), धनश्री लखन सोळसे, लखन शंकर सोळसे ( 33) , सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, श्रीहरी दीपक केकाने - (12), सम्राट दीपक केकाने - (6), संदेश संदीप अस्वले - (11), अनिल साबळे (30), प्रकाश हरी गांगुर्डे (24) , तन्मय लक्ष्मण कांबळे (10), संदीप रघुनाथ अस्वले (40), युवराज विलास साबळे (28), गिरजेश्वरी संदीप अस्वले (9), पूजा संदीप अस्वले (38-40), वैशाली संदीप अस्वले - (14) ,ज्योती दीपक केकडे अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांचे नावे अजून कळू शकले नाहीत.
पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर-मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अपघाताबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच प्रार्थना, असं एक्सवरील सोशल मीडियात म्हटलं. समृद्धी महामार्गावर आजवर एकूण ७२९ अपघात झाले आहेत. यात २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत. या महामार्गावरील सुरक्षेला प्राधान्य देऊन प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य ती पाऊले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत व्यक्त केलीय. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा-
- Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा जागीच ठार
- Buldhana Accident News : खामगाव रोडवर भीषण अपघात; सासू-सासरे अन् सुनेचा अंत