छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Roti Bank : छत्रपती संभाजीनगरात एक असा व्यक्ती आहे, ज्याचं ध्येय गोरगरिबांची भूक भागवण्याचं आहे. तो गेल्या नऊ वर्षांपासून गरिबांना अन्नदान करतोय. युसूफ मकाती असं त्याचं नाव. त्यानं शहरातील जिन्सी परिसरात गंज शहीद मशिदीजवळ एक 'रोटी बँक' स्थापन केली आहे.
कार्यक्रमात उरलेलं अन्न गरिबांना पुरवलं जातं : युसूफ मकाती सांगतात की, ते गेल्या अनेक वर्षांपासून ही बँक चालवत आहेत. मात्र त्यांना कधीही स्वत: जेवण बनवण्याची गरज भासली नाही. शहरात दररोज अनेक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात अन्न उरतं. हे उरलेले अन्न या रोटी बॅंके द्वारे गरिबांना पुरवलं जातं. शहरात रोटी बँकेच्या चार शाखा आहेत, ज्या गरिबांना ३६५ दिवस सेवा देतात. ही रोटी बँक शहरातील झोपडपट्टीच्या भागांत आणि रुग्णालयांमध्ये मोफत अन्न पुरवते.
अन्न जतन करून वाटलं जातं : रोटी बँक चालवणारे युसूफ मकाती सांगतात की, लग्नाच्या हंगामात फंक्शन हॉलमधून भरपूर खाद्यपदार्थ येतात. त्यावेळी या रोटी बँकेचे चार डीप फ्रीझर अपुरे पडतात. त्यामुळे रोटी बँकेसमोर एक मोठा कोल्ड स्टोरेज प्लांट बसवण्यात आला असून, त्यामध्ये अन्न जतन करून नंतर गरिबांना वाटलं जातं. ते पुढे सांगतात की, गेल्या नऊ वर्षांत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र रोटी बँकेत अन्न आलं नाही, असं एकदाही घडलं नाही.
देशातील प्रत्येक शहरात रोटी बँक स्थापन करण्याचं उद्दिष्ट : युसूफ मकाती यांच्या या रोटी बँकेला देशभरातून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्याचं पुढचं उद्दिष्ट आता देशातील प्रत्येक शहरात रोटी बँक स्थापन करण्याचं आहे. याद्वारे गरिबांना दोन वेळचं जेवण मिळावं, अशी त्यांची इच्छा आहे.
हेही वाचा :
- Rajasthan Roti : ऐकावं ते नवलच! राजस्थानात बनवली जगातील सर्वात मोठी 'महारोटी'; व्हिडिओ बघून व्हाल थक्क
- Tandoor Roti by Spitting : विवाह समारंभात थुंकून तंदूर रोटी करणारा कारागीर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक